सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

रविवार, १० जून, २०१८

ओळख मूलद्रव्यांची भाग-९

ओळख मूलद्रव्यांची भाग-९

बेरिलियम

सुमारे २००० वर्षांपूर्वीपासून बेरिलियमचे खनिज ‘बेरिल’ इजिप्तमधील टॉलेमी राजवटीत वापरल्याचा उल्लेख आहे.

बेरिलियम हे अणुक्रमांक चार असलेले  मूलद्रव्य असून अल्कलीमृदा धातू या दुसऱ्या गणातील पहिले मूलद्रव्य आहे.  पृथ्वीच्या कवचात तसेच अंतराळात याचे प्रमाण अत्यल्प आहे.
सुमारे २००० वर्षांपूर्वीपासून बेरिलियमचे खनिज ‘बेरिल’ इजिप्तमधील टॉलेमी राजवटीत वापरल्याचा उल्लेख आहे. पहिल्या शतकात रोमन निसर्गतज्ज्ञ थोरला प्लाइनी यांनी बेरिल आणि एमराल्ड (पाचू) सारखेच आहेत, असे नमूद केले आहे. १७६५च्या सुमारास रेनेजस्ट हॅवी (फ्रान्स) यांना बेरिल आणि एमराल्ड या दोन्ही स्फटिकांची रचना सारखी असल्याचे दिसून आले. त्यांनी लुईस-निकलस वॉकलिन या रसायनतज्ज्ञाला या पदार्थाचे विश्लेषण करायला सांगितले.
१७९८ साली वॉकलिन याने एमराल्ड (पाचू) आणि बेरिल यांच्यापासून नवीन मूलद्रव्य शोधल्याचे सांगितले. या मूलद्रव्याची संयुगे चवीला गोड असल्याने,  Annales de Chimie et de Physique या नियतकालिकाच्या सूचनेवरून या मूलद्रव्याला ‘ग्लुसिनियम किंवा ग्लुसिनम’ हे नाव दिले. पुढे एच. एम. क्लापरोट यांनी इट्रियम या मूलद्रव्याचीदेखील संयुगे गोड असल्याचे सांगितले. आता या नवीन मूलद्रव्याला ‘बेरिलिना’ असे संबोधण्यात आले.  १८२८ साली फ्रिड्रिख व्हलर (जर्मनी) यांनी या मूलद्रव्याचा  ‘बेरिलियम’ असा उल्लेख पहिल्यांदा केला. अनेक वर्षे ग्लुसिनियम व बेरिलियम ही दोन्ही नावे प्रचलित होती; पण १९५७ मध्ये इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री या संस्थेने बेरिलियम या नावाला अधिकृत मान्यता दिली.१८२८ साली फ्रिड्रिख व्हलर (जर्मनी) आणि अँटॉइन बसी (फ्रान्स) या दोघांनी जवळपास एकाच वेळी, पण स्वतंत्रपणे बेरिलियम धातू मिळवण्याची पद्धत शोधली. त्यांनी प्लॅटिनमच्या मुशीत, बेरिलियम क्लोराइड आणि पोटॅशियम एकत्र तापवून बेरिलियम धातू खनिजापासून वेगळा केला.
बेरिलियमचे उत्पादन पहिल्या महायुद्धानंतरच जर्मनी, अमेरिका या देशांत सुरू झाले आणि त्यात मोठमोठे रासायनिक उद्योग सहभागी झाले. १९२१ साली जर्मनीतच बेरिलियमच्या उत्पादनाची रासायनिक प्रक्रिया आल्फ्रेड स्टॉक आणि हॅन्स गोल्डस्मिथ यांनी विकसित केली. १९३२ साली  एका प्रयोगात जेम्य चॅडविक या शास्त्रज्ञाने रेडियमच्या ऱ्हासातून बाहेर पडलेल्या अल्फा कणांचा मारा बेरिलियमच्या नमुन्यावर केला तेव्हा न्यूट्रॉन कणांचे अस्तित्व लक्षात आले. त्यामुळे बेरिलियम हा धातू अणुभट्टीत न्यूट्रॉन कणांच्या निर्मितीसाठी वापरला जातो.
– विजय ज्ञा. लाळे
मराठी विज्ञान परिषदवि. ना. पुरव मार्गचुनाभट्टी,  मुंबई २२ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा