ओळख शास्त्रज्ञांची - डॉ. होमी भाभा
अणुऊर्जा विकासाचे जनक डॉ. भाभा
आपले संशोधन कार्य सांभाळत असतानाच होमी भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.

भारतीय अणुऊर्जा आणि अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेता, पारशी समाजातले डॉ. होमी भाभा आपले इंजिनिअरिंग, गणित आणि न्यूक्लीयर फिजिक्सचे शिक्षण पूर्ण करून १९३९ साली भारतात परतले. काही काळ भाभांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये काम केल्यावर १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यास त्यांनी मदत केली. आपले संशोधन कार्य सांभाळत असतानाच होमी भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भाभांनी या संशोधन संस्थेसाठी सर दोराबजी टाटा ट्रस्टकडून मोठय़ा रकमेची देणगी मिळवून ‘कॉस्मिक रे रिसर्च युनिट’ सुरू केले. त्याच दरम्यान त्यांनी स्वतंत्ररीत्या अण्वस्त्रविषयक संशोधन सुरू केले. यातूनच त्यांच्या पुढाकाराने भारत सरकारचे अॅटॉमिक एनर्जी कमिशन म्हणजेच अणुऊर्जा आयोगाची स्थापना मुंबईत १९४८ साली करण्यात आली. डॉ. होमी भाभा या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष. याच वर्षी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अणुऊर्जा आयोगाच्या पुढच्या योजनांची जबाबदारी भाभांवर सोपवून अण्वस्त्रनिर्मितीची योजना तयार करण्यास सांगितले.
भारतीय स्वातंत्र्यानंतर होमी भाभांनी जगभरात विखुरलेल्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना अणुऊर्जा आयोगासाठी भारतात येऊन संशोधन करण्याचे आवाहन केले आणि त्यातून त्यांना होमी सेठना, विक्रम साराभाईंसारखे सहकारी शास्त्रज्ञ मिळाले. होमी भाभांच्या अथक परिश्रमांमुळेच भारतात अणुभट्टीची स्थापना झाली. पुढे अनेक ठिकाणी अणुभट्टय़ा सुरू होऊन त्यांचा वीजनिर्मितीसाठी उपयोग होऊ लागला. अणुशक्तीचा वापर शांततेच्याच मार्गाने व्हावा असे मत संयुक्त राष्ट्रांच्या सभेत ठामपणे मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक.संयुक्त राष्ट्रांच्या सभेला ते जात होते. २४ जानेवारी १९६६ रोजी फ्रान्सच्या हद्दीत असताना त्यांचे विमान आल्प्स पर्वतावर कोसळून त्यांचे निधन झाले. त्यानंतर ट्रॉम्बे येथील अणू संशोधन केंद्राचे नाव ‘भाभा अणू संशोधन केंद्र’ असे करण्यात आले.
सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा