कुतूहल : मूलद्रव्ये : सर विल्यम रॅम्झी (२ ऑक्टो. १८५२ – २३ जुलै १९१६)
१८८७ नंतर निवृत्तीपर्यंत मात्र ते अकार्बनी रसायनशास्त्राच्या संशोधनात आणि अध्यापनात मग्न होते.

विल्यम रॅम्झी (२ ऑक्टो. १८५२ – २३ जुलै १९१६) या स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञाचा जन्म स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरातला! ग्लासगोमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर – त्या वेळी संशोधनात आघाडीवर असलेल्या- जर्मनीत जाऊन त्यांनी रसायनशास्त्रात डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. प्रथम त्यांनी सेंद्रिय (कार्बनी) रसायनशास्त्रात संशोधन केले आणि १८८०नंतरच्या वर्षांत सुरुवातीस त्यांचे लक्ष भौतिकी रसायनशास्त्राकडे वळले. १८८७नंतर निवृत्तीपर्यंत मात्र ते अकार्बनी रसायनशास्त्राच्या संशोधनात आणि अध्यापनात मग्न होते.
डॉक्टरेट मिळवून ग्लासगोला परत आल्यावर त्यांनी अल्कलॉइडवर (वनस्पतींपासून मिळणारे रसायन) संशोधन केंद्रित केले. ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सिडनी यंग यांच्याबरोबर संशोधन करून रॅम्झी यांनी, द्रव आणि बाष्प यांच्या भौतिक गुणधर्माविषयी तीस शोधनिबंध प्रसिद्ध केले. ‘रासायनिकदृष्टय़ा सारख्या असलेल्या दोन द्रावांचा बाष्पदाब ज्या तापमानाला एकच असतो त्या तापमानाचे गुणोत्तर बाष्पदाबावर अवलंबून नसते’ हे दर्शवणारा रॅम्झी-यंग नियम त्या दोघांनी एकत्रितपणे मांडला. १८८७मध्ये त्यांनी सापेक्षत: शुष्क अमोनिया व हायाड्रोक्लोरिक आम्ल यांत अभिक्रिया होत नाही, हे शोधले. प्रयोगशाळेत तयार केलेला नायट्रोजन आणि हवेतून वेगळा केलेला नायट्रोजन यांच्या घनतेत फरक असतो, हे लॉर्ड रॅली यांनी दाखवून दिले होते. हा फरक कशामुळे येतो यावर रॅम्झी यांनी संशोधन केले आणि असे दाखवून दिले की, हवेतील नायट्रोजनमध्ये आणखी काही जड वायू आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा