ओळख शास्त्रज्ञांची-
कुतूहल – आधुनिक आवर्तसारणी
आज एकूण ११८ मूलद्रव्ये ज्ञात असून त्यांची मांडणी आधुनिक आवर्तसारणीत शास्त्रोक्त पद्धतीने केली आहे.

आज एकूण ११८ मूलद्रव्ये ज्ञात असून त्यांची मांडणी आधुनिक आवर्तसारणीत शास्त्रोक्त पद्धतीने केली आहे. हेन्री मॉसले यांनी मेंडेलिव्ह सिद्धांत सुधारताना आधुनिक आवर्तसारणीत मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुक्रमांकानुसार केल्याने मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीतील त्रुटी दूर झाल्या. मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म त्यांच्या अणुक्रमांकाचे आवर्ती कार्य आहे असा सिद्धांत त्याने मांडला. आधुनिक आवर्तसारणी या सिद्धांतावर आधारित आहे. आवर्तसारणीच्या रचनेत आडव्या रांगांना आवर्त (पिरियड) तर उभ्या स्तंभांना गण (ग्रूप) म्हणतात.आधुनिक आवर्तसारणीत मूलद्रव्यांची मांडणी सात आवर्त व अठरा गणांमध्ये केली आहे. आवर्ताचा क्रमांक मूलद्रव्यातील ऊर्जा-स्तरांची (एनर्जी लेव्हल्स) संख्या दर्शवितो. जसे चौथ्या आवर्तामधील मूलद्रव्यांमध्ये ऊर्जेचे चार स्तर (K, L, M, N) आढळतात. प्रत्येक आवर्ताच्या सुरुवातीचे मूलद्रव्य अत्यंत क्रियाशील तर शेवटचे निष्क्रिय असते. आवर्त क्र. १ मध्ये दोन मूलद्रव्ये, क्र. २ व ३ मध्ये आठ मूलद्रव्ये, क्र. ४ व ५ मध्ये १८ मूलद्रव्ये, क्र. ६ मध्ये ३२ मूलद्रव्ये व क्र. ७ मध्ये सध्या ३२ मूलद्रव्ये असून त्यांना अनुक्रमे लघुतम, लघु, लांब, अति लांब व अपूर्ण आवर्त असे म्हणतात.आधुनिक आवर्तसारणीत समान इलेक्ट्रॉन संरूपण असलेली मूलद्रव्ये एकाखालोखाल एक येऊन त्यांचा गण तयार होतो. मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म त्याच्या लेक्ट्रॉन संरूपणावर अवलंबून असतात म्हणूनच ठरावीक अंतराने गुणधर्माची पुनरावृत्ती होते. गणातील मूलद्रव्ये एका कुटुंबातील सदस्यांप्रमाणे स्वतंत्र असली तरी समान वैशिष्टय़े दाखवतात. त्यांच्या गुणधर्मात चढ- उताराचा निश्चित कल दिसून येतो. ग्रूप क्र. १, २, १३, १४, १५, १६ व १७ मधील मूलद्रव्यांना सामान्य तसेच क्र ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११ व १२ च्या मूलद्रव्यांना संक्रमण तर १८व्या ग्रूपमधील मूलद्रव्यांना निष्क्रिय वायू (इनर्ट अथवा नोबल गॅस) म्हणतात.खालच्या बाजूस दोन रकान्यांत मांडलेल्या मूलद्रव्यांना अनुक्रमे लँथनाइड व अॅक्टिनाइड म्हणतात. बाकीचे ग्रूप्स विस्कळीत न होता सुसूत्रता साधण्यासाठी सदर मूलद्रव्यांची मांडणी स्वतंत्रपणे केली गेली. अधिक माहितीसाठी :
– मीनल टिपणीस मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा