सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

गुरुवार, ७ जून, २०१८

ओळख शास्त्रज्ञांची - हेन्री कॅव्हेंडीश

हेन्री कॅव्हेंडिश

हेन्री कॅव्हेंडिश हे ब्रिटिश रसायन आणि भौतिक शास्त्रज्ञ होते.

हेन्री कॅव्हेंडिश हे ब्रिटिश रसायन आणि भौतिक शास्त्रज्ञ होते. वातावरणातील हवेतील घटकांचं प्रमाण, वायूंचे गुणधर्म, पाण्यातील रासायनिक घटक आणि गुरुत्वाकर्षण या विषयात हेन्री कॅव्हेंडिश यांनी संशोधन केलं. हेन्री कॅव्हेंडिश यांचा जन्म १० ऑक्टोबर १७३१ रोजी फ्रान्समधील नाइसि येथे झाला आणि शिक्षण इंग्लंड येथील केम्ब्रिज विद्यापीठातून झालं. तीन वर्ष शिक्षण घेतल्यावर पदवी न घेताच त्यांनी विद्यापीठ सोडलं पण संशोधन मात्र सुरूच ठेवलं.
हायड्रोजन वायूचा शोध लावताना हायड्रोजनची आणि इतर वायूंची घनता त्यांनी मोजली. हायड्रोजन वायूचं हवेत ज्वलन झालं असता दव म्हणजेच पाण्याचे थेंब तयार होत असल्याचं कॅव्हेंडिश यांनी सिद्ध केलं. पाण्यातील ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं प्रमाण १:२ असतं असं त्यांनी १७४८ मध्ये सिद्ध केलं. नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यातून विद्युत ठिणगी नेली असता नायट्रिक आम्ल तयार होते असा शोध त्यांनी १७८५ मध्ये लावला. हा शोध औद्योगिकदृष्टय़ा उपयुक्त ठरला. गुरुत्वाकर्षण, विद्युत भार यांसारख्या सूक्ष्म प्रेरणा मोजण्यासाठी एक उपकरण त्यांनी तयार केलं. या उपकरणाच्या साहाय्याने १७९८ साली कॅव्हेंडिश यांनी गुरुत्वाकर्षण स्थिरांक मोजला व पृथ्वीची सरासरी घनता काढली. आधुनिक प्रयोगांवरून काढलेली पृथ्वीची घनता आणि कॅव्हेंडिश यांनी काढलेली पृथ्वीची घनता यात केवळ एक टक्क्याचाच फरक आहे. ध्रुवीय प्रकाश, भूविज्ञान, विद्युत अशा विविध विषयांत त्यांनी संशोधन केलं. प्रयोगांतील अचूकता हे त्यांचं वैशिष्टय़ होतं. साखरेच्या किण्वन प्रक्रियेतून निघालेल्या उत्पादकाबद्दल (कार्बन डाय ऑक्साइड वायूबद्दल) त्यांनी संशोधन केलं.कॅल्शियम काबरेनेट आणि कार्बन डायॉक्साइड यांच्या अभिक्रियेत कॅल्शियम बायकाबरेनेट तयार होतं, हा शोध कॅव्हेंडिश यांनी लावला. ही अभिक्रिया परिवर्तनीय (रिव्हर्सबिल) असते. ही अभिक्रिया कठीण पाण्याचं एक कारण आहे. कठीण पाणी कॅल्शियम हायड्रॉक्साइड वापरून मृदू करता येईल, असं संशोधन त्यांनी केलं.
हेन्री कॅव्हेंडिश रॉयल सोसायटीचे सदस्य आणि इन्स्टिटय़ूट ऑफ फ्रान्सचे परदेशीय सदस्य होते. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ केम्ब्रिज येथील एका प्रयोगशाळेला ‘कॅव्हेंडिश फिजिकल लॅबोरेटरी’ असं नाव दिलं आहे. या प्रयोगशाळेत त्यांची बरीच उपकरणं जतन करून ठेवली आहेत.
– अनघा वक्टे        
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

ओळख मूलद्रव्यांची भाग- ७

ओळख मूलद्रव्यांची भाग- ७

लिथियम

निसर्गात लिथियम मुक्त स्थितीत आढळत नाही

सामान्य स्थितीमध्ये अर्थात कक्ष-तापमानाला सर्व स्थायूरूप मूलद्रव्यांमध्ये लिथियम सर्वात हलका धातू आहे. तो चांदीसारखा पांढरा परंतु मऊ असतो आणि चाकूने कापताही येतो. लिथियम साठवून ठेवणं फार कठीण. अति क्रियाशील असलेला हा धातू हवेत उघडा राहिला असता लगेच काळा पडतो व पृष्ठभागावर त्याचे ऑक्साइड तयार होते. म्हणूनच लिथियम पेट्रोलियम जेली लाऊन साठवला जातो. अल्कली धातू असलेला हा लिथियम अग्निजन्य खडकांपासून माहीत झाला, मात्र इतर अल्कली धातू वनस्पतींपासून शोधले गेले. म्हणूनच या मूलद्रव्याला दगड अशा अर्थाने ‘लिथोस’ या ग्रीक शब्दावरून लिथियम हे नाव दिले गेले.
निसर्गात लिथियम मुक्त स्थितीत आढळत नाही; तो सामान्यपणे सर्व अग्निजन्य खडकांमध्ये आणि खनिजांच्या झऱ्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आढळतो. स्पॉडय़ुमिन, पेटॅलाइट, लेपिडोलाइट, अ‍ॅम्ब्लियगोनाइट या खनिजांपासून लिथियम पुरेशा प्रमाणात मिळते. समुद्राच्या पाण्यात एक कोटी भागांत सुमारे एक भाग इतक्या अल्प प्रमाणात लिथियम आढळतो. नैसर्गिकरीत्या  लिथियम (६) वलिथियम (७) ही लिथियमची दोन समस्थानिके आढळतात.
१७९० साली स्वीडनमधील युटो बेटावर जोस बोनिफॅशियो-द-अ‍ॅद्राल्दा-द-सिल्वा या रसायनशास्त्रज्ञाला पेटॅलाइट हे खनिज आढळून आले. आगीवर या खनिजाची भुकटी फवारली असता ज्योत भडक किरमिजी रंगाची होत असल्याचे त्यांना  दिसले. १८१७ साली या खनिजाचे विश्लेषण करत असताना जोहान ऑगस्त आर्फव्हेडसन यांना लिथियम धातूचा शोध लागला. लिथियम हा सोडियमपेक्षा हलका असल्याचे त्यांच्या लक्षात आले, परंतु त्यांना लिथियम वेगळा करता आला नाही. १८२१ साली विल्यम ब्रँडे यांनी लिथियम ऑक्साइडचे विद्युत अपघटन करून अत्यंत कमी प्रमाणात लिथियम वेगळा केला. १८५५ साली रॉबर्ट बुन्सेन (बुन्सेन बर्नरचा जनक) आणि ऑगस्तस मॅथिसन यांनी वितळलेल्या लिथियम क्लोराइडचे विद्युत अपघटन करून ग्रॅममध्ये मोजता येईल, एवढा लिथियम वेगळा केला. १९२३ मध्ये लिथियम क्लोराइड व पोटॅशियम क्लोराइड या संयुगाच्या मिश्रणाचे विद्युत अपघटन करून लिथियमच्या व्यापारी उत्पादनाची पद्धत जर्मनीतील एका कंपनीने शोधून काढली.चिली, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल या देशांत लिथियमचे उत्पादन होत असून त्यात चिली आघाडीवर आहे.
– विजय ज्ञा. लाळे   
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष ७ जून

दिनविशेष ७ जून
 अॅलन ट्युरिंग-संगणक शास्त्रज्ञ

स्मृतिदिन - ७ जुन १९५४


आज आपण संगणक शास्त्राचा वापर करून जी काही तंत्रज्ञानामध्ये प्रगती करत आहोत, त्याचे सर्व श्रेय अॅलन ट्युरिंगकडे जाते. आधीच्या काळी, संगणक हा फक्त त्यामध्ये फिड करण्यात आलेल्या गोष्टी करण्यापुरताच मर्यादित होता. त्यासाठीदेखील खूप कष्ट घ्यावे लागत. ‘त्या’ काळात अतिशय अशक्यप्राय समजली जाणारी गोष्ट म्हणजे मशीनला विचार करायला लावून, तिच्याकडून एखादे काम करवून घेणे. आणि यात अॅलन यशस्वी झाला होता. अॅलन ट्युरिंगच्या कामाचा, प्रोग्रामिंग भाषा तयार करण्यामध्ये मोठा प्रभाव आहे. एवढेच नव्हे तर आज ‘मानवनिर्मित बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence) ही जी संगणकीय शास्त्राची एक शाखा आहे, तिचादेखील अॅलन ट्युरिंगच जनक आहे. गूगलची ‘सेल्फ-ड्रायव्हिंग कार’, मायक्रोसॉफ्टचे ‘कोर्टाना’ (Cortana) आणि अॅपलची‘सिरी’ (Siri) हे वैयक्तिक सहाय्यक (PA) अॅप्, Cleverbot, ... हे सर्व याच शाखेचे उपयोजनं आहेत.
अॅलन ट्युरिंगला लहानपासुनच गणित व विज्ञानाकडे नैसर्गिक ओढ होती आणि ‘शेर्बोर्ने पब्लिक स्कूल’मध्ये शिक्षकांचा भर हा साहित्यावर होता. अॅलन ट्युरिंगची गणित आणि विज्ञानाविषयी असलेली आवड हि अभ्यासाच्या बाहेरील होती. तेव्हा तेथील शिक्षकांनी अॅलनच्या आईला बोलावून, ‘त्याला जर वैज्ञानिक क्षेत्रात कारकीर्द करायची असेल तर तो येथे त्याचा वेळ वाया घालवत आहे.’ असे स्पष्टपणे सांगितले होते. लहानपणीच ‘कॅल्क्युलस’ (गणिताचा एक प्रकार) न शिकताच तो गणितातील अतिशय कठीण प्रश्न सोडवत असे. वयाच्या १६व्या वर्षी, त्याची आईन्स्टाईनच्या कामाशी ओळख झाली. तेव्हा आईनस्टाईनच्या सर्व कामाचा स्वतःच अभ्यास करून, त्याने त्याच्या नोट्सदेखील बनवल्या होत्या. 
ट्युरिंगने प्रसिद्ध केलेले सर्व प्रबंध ‘अॅलन ट्युरिंग- हिज वर्क अँड इम्पॅक्ट’ या पुस्तकात पाहायला मिळतात. आतापर्यंत ट्युरिंगच्या आयुष्यावर खूप पुस्तके आली आहेत. त्यापैकी ‘‘अॅलन ट्युरिंग- दि एनिग्मा’ या पुस्तकावर २०१४ मध्ये ‘दि इमीटेशन गेम’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे. यामध्ये बेनेडिक्ट कंबरबॅच याने अतिशय सुंदररित्या अॅलन ट्युरिंगची व्यक्तीरेखा साकारली आहे. हा चित्रपट बराच गाजला होता आणि ऑस्करच्या शर्यतीत देखील सहभागी झाला होता.

ओळख मूलद्रव्यांची भाग-६

ओळख मूलद्रव्यांची भाग-६

हेलिअम – सूर्यातील मूलद्रव्य

 १८ ऑगस्ट १८६८ या दिवशी फ्रेंच खगोल शास्त्रज्ञ ‘पीअर जॅनसन’ हे खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी भारतात आले. सूर्यग्रहण पाहताना सूर्याच्या वर्णपटात (सूर्यकिरण लोलकातून जाऊ दिले असता, बाहेर पडताना सप्तरंगी वर्णपट पाहायला मिळतो) एक पिवळ्या रंगाची रेषा त्यांना आढळली. सूर्यग्रहण नसतानाही निरीक्षण केले असता सूर्याच्या वर्णपटात पिवळ्या रंगाचा प्रकाश दिसला. सोडिअम या मूलद्रव्याचे ज्वलन झाले असता, त्याची ज्वाला पिवळ्या रंगाची दिसते. पण ‘पीअर जॅनसन’ यांना सूर्याच्या वर्णपटात दिसलेला पिवळा रंग सोडिअम या मूलद्रव्याच्या पिवळ्या रंगापेक्षा वेगळा आढळला. त्याच वर्षी जोसेफ नॉर्मन लॉकयेर आणि एडवर्ड फ्रँकलँड यांनाही सूर्याच्या वर्णपटात हा पिवळा रंग आढळला. आणि तो सूर्यात असणाऱ्या मूलद्रव्याचा आहे असा शोध लागला. या रंगाची तरंगलांबी ५८७.४९ नॅनोमीटर म्हणजेच ०.००००००५८७४९ मीटर होती. जोसेफ नॉर्मन लॉकयेर आणि एडवर्ड फ्रँकलँड या दोघांनीही या मूलद्रव्यास सूर्याला ग्रीक भाषेत असलेल्या हेलिओज (helios) या नावावरून हेलिअम असे नाव दिले. पृथ्वीवर सापडण्याआधी पृथ्वीबाहेर सापडलेले हे पहिलेच मूलद्रव्य. भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे हेलिअमचा शोध ‘पीअर जॅनसन’ यांना भारतातून लागला.
विश्वात सर्वाधिक प्रमाणात हायड्रोजन सापडतो (९२ टक्के) आणि दुसरा क्रमांक हेलिअमचा लागतो (७.१९ टक्के).सूर्यावर आढळलेले हे मूलद्रव्य दोन वर्षांनंतर, लुईंगी पामित्री या भौतिकतज्ज्ञाला इटली देशातील ‘व्हेसुव्हिअस’ पर्वताच्या ज्वालारसात आढळले. १८९५ मध्ये रसायन शास्त्रज्ञ सर विल्यम रामसे यांनाही पृथ्वीवर  हेलिअमच्या अस्तित्वाचा शोध लागला.
युरेनियम या किरणोत्सारी असलेल्या मूलद्रव्याचा ऱ्हास होत असताना हेलिअम तयार होते. वातावरणात अत्यल्प प्रमाणात असल्याने वातावरणातून हेलिअम मोठय़ा प्रमाणात मिळविणे फार खर्चीक आहे त्यामुळे नैसर्गिक वायूंच्या साठय़ातून मिळत असलेला हेलिअम साठवला जातो. लष्करी आणि अन्य प्रकारच्या फुग्यांमध्ये वापर होत असल्याने, भविष्यातील वापराच्या दृष्टीने यू.एस.ए.मधील टेक्सास येथे हेलिअम तयार करून साठवला जातो.
रॉकेट्समध्ये इंधन म्हणून हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर – निष्क्रिय आणि न जळणारा असल्याने – हेलिअमचा उपयोग केला जातो. तांबे, अ‍ॅल्युमिनियम, मॅग्नेशियम यांची संमिश्रे जी उष्णतेचे सुवाहक आहेत यांच्या प्रज्योत सांधण म्हणजेच वेल्डिंगमध्येही हेलिअमचा वापर केला जातो.
– अनघा वक्टे मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

दिनविशेष ६ जून

दिनविशेष ६ जून
  रॉबर्ट स्टर्लिंग- स्टर्लिंग इंजिनचे अविष्कारकर्ते

स्मृतिदिन - ६ जुन १८७८

रेव्हरेड डॉ रॉबर्ट स्टर्लिंग (२५ ऑक्टोबर १७९० - ६ जून १८७८) एक स्कॉटिश होते , आणि स्टर्लिंग इंजिनचे आविष्कारकर्ते होते. त्यांचा सर्वोत्तम ज्ञात शोध हा हिट इंजिन आहे, जो आता स्टर्लिंग इंजिन म्हणून ओळखला जातो.
‍१८१६ मध्ये रॉबर्ट स्टर्लिंग आणि त्याचा धाकटा भाऊ जेम्स स्टर्लिंगने स्कॉटलँड व इंग्लंड या दोन्ही ठिकाणी हिट इंजिनच्या पेटंटसाठी अर्ज केले. या शोधाचे कार्य म्हणजे एका ठराविक यंत्रणेद्वारे हवेच्या माध्यमातुन
उष्णता साठवून ठेवणे आणि ती रिलीज करणे हे होते. हे इंजिन त्याकळी सर्रासपणे वापरले जाणार्या वाफेच्या इंजिनपेक्षा वेगळे होते.
या संशोधनामध्ये राॅबर्ट यांना बर्‍याच अडचणी आल्या. त्यांनी आवश्यक ते बदल करुन पुन्हा एक सुधारित पेटंट सादर केला आणि त्यात ते यशस्वी झाले.
आजकाल स्टर्लिंग इंजिनचा उपयोग क्वचितच होत असला तरी, लॉस अलामोस नॅशनल लेबोरेटरी आणि नासा यांसारख्या रिसर्च संस्थांच्या व्यवसायात या इंजिनबद्दल रस असल्याचे दिसते.

ओळख मूलद्रव्यांची भाग-५

ओळख मूलद्रव्यांची भाग-५

हायड्रोजनचे समस्थानिक : ट्रीशियम

अण्वस्त्रांची चाचणी घेतानाही ट्रीशियम तयार होते.

हायड्रोजनच्या केंद्रकात न्यूट्रॉनची संख्या दोन असते तेव्हा ते हायड्रोजन ३ (एक प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन) म्हणजे ट्रीशियम हे समस्थानिक असते. निसर्गात आढळणारे हे समस्थानिक अंतरिक्षातून येणाऱ्या विश्वकिरणांचा (कॉस्मिक लहरी) पृथ्वीवरील वातावरणातील वायूशी संयोग होऊन तयार होते आणि पाण्यात मिसळते. समुद्रातील पाण्यात दर १०१८ (एकावर अठरा शून्ये) हायड्रोजन अणूपाठी एक अणू ट्रीशियमचा असतो, इतके ते अत्यल्प प्रमाणात असते. अण्वस्त्रांची चाचणी घेतानाही ट्रीशियम तयार होते. अणुभट्टीमध्ये लिथियम ६, या लिथियमच्या समस्थानिकावर न्यूट्रॉनचा मारा केला असता ट्रीशियम तयार होते. १९३४ मध्ये भौतिक तज्ज्ञ अर्नेस्ट रूदरफोर्ड, एम.एल. ओलिफण्ट आणि पॉल हार्टेक या शास्त्रज्ञांनी डय़ुटेरिअमपासून कृत्रिमरीत्या ट्रीशियम हे समस्थानिक तयार केले.
ट्रीशियम हे समस्थानिक स्थिर नाही तर किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम ट्रीशियम हे बरोबर बारा वर्षे सहा महिन्यांनी किरणोत्सर्गामुळे घट होऊन अर्धे होईल आणि उरलेले अर्धे बीटा किरणांच्या उत्सर्जनामुळे हेलिअममध्ये रूपांतरित होईल. ट्रीशियमचा उपयोग भूगर्भातील पाण्याचे वयोमान शोधण्यासाठी केला जातो. समस्थानिकांच्या भूरसायनशास्त्रीय (आयसोटोप जीओकेमिकल) अभ्यासामध्ये ट्रीशियमचा उपयोग केला जातो. किरणोत्सारी असल्याने घडय़ाळे, आपत्कालीन बाहेर जाण्याच्या सूचनांचे फलक (इमर्जन्सी एक्झिट साइन बोर्ड) अशा स्वनियंत्रित प्रकाशसाधनांमध्ये ट्रीशियमचा उपयोग केला जातो.अणुभट्टीमध्ये लिथियम ६ या लिथियमच्या समस्थानिकावर न्यूट्रॉनचा मारा केला असताही ट्रीशियम तयार होते. हायड्रोजन १(प्रोटियम), हायड्रोजन २ (डय़ुटेरियम) आणि हायड्रोजन ३ (ट्रिशियम) हे तिन्ही निसर्गात आढळणारे आहेत. याशिवाय हायड्रोजनची आणखी चार समस्थानिके; हायड्रोजन ४, हायड्रोजन ५, हायड्रोजन ६, हायड्रोजन ७ ही कृत्रिमरीत्या तयार केली जातात. अनुक्रमे तीन, चार, पाच आणि सहा न्यूट्रॉन असलेली ही समस्थानिके अस्थिर असतात. अणुकेंद्रकीय प्रक्रियेमध्ये ट्रीशियमचा वापर केला जातो. डय़ुटेरिअम आणि ट्रीशियमच्या केंद्रकीय संमीलनात तयार होणारी उष्णता ऊर्जा आण्विक शस्त्रांमध्ये वापरली जाते. रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्रात कृत्रिम किरणोत्सार शोधक म्हणून ट्रीशियमचा उपयोग केला जातो.
– डॉ. विद्यागौरी लेले    
मराठी विज्ञान परिषदवि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष ५ जून

दिनविशेष ५ जून

५ जून- जागतिक पर्यावरण दिवस

आज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाचा इतक्या वर्षांत झालेला र्‍हास पाहुन खरं तर शंका येते हे असे वेगवेगळे दिवस साजरे करुन आपण नक्की काय करतो....कदाचीत असं असेल की नाहीतर यापेक्षा अपरिमीत हानी झाली असती.
मोठी लोकं काही करो न करो, आपण एक सर्वसामान्य नागरिक आणि या पर्यावरणाचे इतके वर्षांचे हानीकारक म्हणून निदान आता तरी जागं व्हावं हे मात्र सर्वांना पटेल..या वर्षी माझ्या मुलाच्या पाळणाघरात संपुर्ण आठवडा Reduce, Reuse and Recycle असा पाळला गेला...खरं एक कशाला सगळेच आठवडे का नाही असे पाळत असं मला आपलं वाटलं पण चला निदान सुरुवात तर आहे...
मुळात जितकं आपण कमी वापरु तितकं त्याचा कचरा कमी..जमेल तिथे हे तत्व पाळणं सोप्पं आहे...खोलीत गरज असतानाच दिवे,पंखे, एसी (एसी शक्य तितका टाळावा हेच उत्तम) आणि बाहेर पडताना वीजेची उपकरणी आठवणीने बंद करणे यात आपण कमी वापरण्याचं तत्व अमलात आणू शकतो. पाण्याचंही तेच. नळाची धार थोडी कमी करावी आणि पिण्यासाठीही पाण्यासारखा धर्म नाही असं असलं तरी पुर्वीचं तांब्या-भांडं तत्व जास्त चांगलं म्हणजे जेवढं हवं तेवढंच पाणी प्यालं जात आणि बाकी उष्टं नं झाल्यामुळे वाया जात नाही...कागदाचा कमी वापर हेही महत्वाचं..मोठ्या रेस्टॉरन्ट्समध्ये रुमाल असतात तिथे पुन्हा पेपर टिश्यु वापरायचं हमखास टाळता येईल. घरीही शक्यतो ओटा पुसायला इ. फ़डकी वापरलीत तर ती धुता येतात किंवा वाटल्यास टाकता येतात. त्यासाठी खास रोज पाच-सहा बाउन्टी कशाला वापरा? शाळेतल्या वह्यांमधल्या उरलेल्या पानांची रफ़ वही बनवणं हेही एक प्रकारे वापरातली एक वही कमी करण्यासाठी मदतच करतं...आता या कमी वापरात आपण फ़क्त वाचवतोय उगाच कंजुषी नाही तर वायफ़ळपणा टाळतोय..असे अनेक उपाय आहे Reduce साठीचे...
Reuse म्हणजे पुन्हा वापरणंही नेहमीच चांगलं. उदा. लहान मुलांना घरी चित्रकला इ. उद्योग करायला पाठकोरे कागद दिले तरी काम होतं. मुळात प्लास्टिकपिशव्या टाळाव्या पण आल्याच तर शक्य असल्यास मग एक-दोनदा त्याच वापराव्यात म्हणजे निदान थोडं गिल्टी फ़िलिंग कमी. माझी आई भाज्या धुतलेलं पाणी नेहमी कुंड्यांमध्ये झाडांना घालते. माझ्या लहानपणापासुन पाहिलेलं पुनर्वापराचं हे सगळ्यात सुंदर आणि सोपं तत्व आहे. तसंच सांडपाण्यावर बागा फ़ुलवणारी एक सोसायटीही मला माहित आहे. मोठ्या लेव्हलवर जमत असेल तर तोही प्रयोग करायला हरकत नाही. 
Recycle करणं केव्हाही चांगलं पण त्यासाठीसुद्धा एनर्जी लागते म्हणून वरची दोन तत्व पाळून जे उरेल आणि शक्य असेल त्याचं रिसायकलिंग करणं हे उत्तम.म्हणजे ते वर म्हटलेले पाठकोरे कागद दोन्ही बाजुनी भरले की मग सुक्या कचर्‍यात टाकावे. नेहमीच ओला आणि सुका कचरा वेगळा करणं चांगलं. आता सगळीकडे तो वेगवेगळा उचलण्याची सोयही आहे. शिवाय एखाद्याचं मोठं घर, पाठी अंगण इ. असेल तर मग ओल्या कचर्‍याचं कंपोस्ट बनवुन त्याचं खत झाडांना वापरणं हेही खूप किफ़ायतशीर ठरु शकेल. अमेरिकेतील काही गावांत एखाद्या मोकळ्या ठिकाणी आपण स्वतः आपला असा कचरा नेऊन कंपोस्ट खताच्या खड्यात नेऊन टाकु शकतो आणि नंतर गरज पडेल तेव्हा तेच खत स्वतःच्या बागेसाठी फ़ुकट घेऊनही येऊ शकतो..खूपच अभिनव कल्पना आहे ही. त्याने रासायनिक खतांचा वापर कमी होऊन पर्यावरण शुद्धीकरणासाठी मदतच होते...
खरं तर या विषयावर जेवढं मांडावं तेवढं कमी आहे..आणि असे एक दिवस साजरे करण्यापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनाला हे वळण लावणं जास्त आवश्यक आहे. आपली नैतिक जबाबदारी म्हणून याचं भान आपण ठेऊया आणि आजच्या पर्यावरण दिवसापासून जमेल तितकं environmental freindly वागायचं ठरवुया.

दिनविशेष ४ जून

दिनविशेष ४ जून

इन्सॅट २ डी - भारतीय उपग्रह

प्रक्षेपण - ४ जुन १९९७

इन्सॅट २ डी हा communication (संप्रेषण) उपग्रह फ्रेंच येथील गयाना, कोऊरू या ठिकाणाहुन प्रक्षेपित करण्यात आले.
काही विजेसंबंधीच्या आणि इतर अडचणींमुळे प्रक्षेपणाचे ठिकाण बदलावे लागले.

उपग्रहाचे वजन - 2079 किलो

मिशन अवधी : सात वर्षे (नाममात्र)

पॉवर : 1650 वॅट्स

उपग्रह प्रकार: संप्रेषण

निर्माता: इस्रो

मालक: इस्रो

अनुप्रयोग: संप्रेषण

ऑर्बिट प्रकार: जीएसओ

सोमवार, ४ जून, २०१८

ऒळख मूलद्रव्यांची भाग-४

ओळख मूलद्रव्यांची भाग-४

कुतूहल : हायड्रोजनचे समस्थानिक : डय़ुटेरिअम

हायड्रोजन या मूलद्रव्याला दोन समस्थानिके आहेत. त्यातील पहिले डय़ुटेरिअम.

प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूत प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. अणूतील प्रोटॉनची संख्या म्हणजे मूलद्रव्याचा अणुक्रमांक किंवा अणुअंक, न्यूट्रॉन अधिक प्रोटॉनची संख्या म्हणजे मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक. समस्थानिके म्हणजे समान अणुक्रमांक मात्र भिन्न अणुवस्तुमानांक म्हणजेच न्यूट्रॉन्सची संख्या वेगळी असलेले मूलद्रव्य. समस्थानिकाला इंग्रजीत आयसोटोप म्हणतात. खरं तर आयसोटोप हा ग्रीक शब्द आहे, याचा अर्थ होतो  ‘द सेम प्लेस’. आवर्तसारणीत मूलद्रव्यांना त्यांच्या अणुक्रमांकानुसार स्थान मिळालेले आहे, त्यामुळे मूलद्रव्याला कितीही समस्थानिके असली तरी अणुक्रमांक समान असल्याने मूळ मूलद्रव्यांची आणि समस्थानिकांची आवर्तसारणीतील जागा एकच असते.
हायड्रोजन या मूलद्रव्याला दोन समस्थानिके आहेत. त्यातील पहिले डय़ुटेरिअम. हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नसतो (याला हायड्रोजन १ अथवा प्रोटियम असेही म्हटले जाते) तर डय़ुटेरिअममध्ये एक न्यूट्रॉन असतो त्यामुळे त्याचा अणुभार वाढतो.
‘हेरॉल्ड उरे’ या अमेरिकन भौतिकी-रसायनशास्त्रज्ञाने १९३१ साली डय़ुटेरिअम या हायड्रोजनच्या समस्थानिकाचा शोध लावला. या शोधासाठी १९३४ मध्ये त्यांना मानाचे नोबेल पारितोषिक मिळाले. अथांग सागर हा डय़ुटेरियमचा एक स्रोत आहे. समुद्रामधल्या
पाण्यात ६४२० हायड्रोजनच्या अणूंपाठी एक अणू हा डय़ुटेरिअमचा असतो. अणुभट्टीमध्ये आण्विक प्रकिया सुरू करण्यासाठी डय़ुटेरॉनचा वापर होतो. डय़ुटेरॉन म्हणजे डय़ुटेरियमचे केंद्रक.अणुभट्टीमध्ये निरंतर तयार होणारी उष्णता काढून त्याचे विजेत रूपांतर करण्यासाठी जड पाणी वापरले जाते. जड पाण्यामध्ये हायड्रोजनची जागा डय़ुटेरिअम घेते. भारतात हे जड पाणी बनविण्याचे आठ प्रकल्प आहेत, त्यामुळे जड पाणी बनविण्यात भारत अग्रेसर आहे आणि अभिमानाची गोष्ट अशी की, इतर देशांना आपण जड पाणी पुरवितो.
अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉन कणांचा वेग मर्यादित करण्याकरितादेखील डय़ुटेरियम हे समस्थानिक महत्त्वाचे आहे. तसेच विविध रेणूंची रचना जाणण्यासाठी एन.एम.आर. म्हणजे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (केंद्रकीय चुंबकीय संस्पंदन).
या मूलद्रव्याच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्म अभ्यासण्याच्या प्रणालीमध्ये डय़ुटेरियम वापरतात. त्यात हायड्रोजनयुक्त द्रावण चालत नाही. अशा वेळेस, हायड्रोजनसारखेच वागणारे हे समस्थानिक फार उपयोगाला येते.
– डॉ. विद्यागौरी लेले ,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

दिनविशेष ३ जून

दिनविशेष ३ जून 
अतुल चिटणीस (भारतीय संगणक अभियंता)
स्मृतिदिन - ३ जून २०१३



अतुल चिटणीस (20 फेब्रुवारी 1962 - ३ जून २०१३ ) हे जर्मनीत जन्मलेले भारतीय संगणक अभियंता होते. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सना "लिनक्‍स सॉफ्टवेअर' वापराची ओळख करून देण्याचा मान प्रथम चिटणीस यांच्याकडे जातो. त्यांनी प्रसिद्ध नियतकालिक "पीसीक्वेस्ट'साठी सहा वर्षे सल्लागार संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
कारकिर्द
तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभाराची गुरूकिल्ली हाती येते ; तरी कित्येकदा तंत्रज्ञानही मक्तेदारीमध्ये जखडून ठेवण्याची खेळी प्रस्थापितांकडून केली जाते. या जोखडातून कम्प्युटर तंत्रज्ञानाची सुटका करून ते सर्वांना उपलब्ध व्हावे ,याचा पाठपुरावा करण्यात ओपन सोर्सचे प्रणेते अतुल चिटणीस यांनी आपली कारकीर्द घडवली. फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे प्रणेते म्हणून १९९४पासून अतुल चिटणीस हे नाव भारताला ठाऊक झाले. साधारण त्याच काळात उद्योगव्यवहारांमध्ये वह्यापेन्सिली आणि कागदी फायलींची जागा कम्प्युटर घेऊ लागला होता. कदाचित त्यावेळी , सॉफ्टवेअर कुणा कंपन्यांच्या मक्तेदारीत बांधलेले नसावे , या विचाराचे मोल सर्वांना तितकेसे उमजत नसावे. नंतर भारतीय भाषांच्या वापरातील अडचणी , परवान्यासाठी मोजावी लागणारी किंमत तसेच भारतीय डेटाची सुरक्षितता व परावलंबित्वाचे प्रश्न यामुळे ओपन सोर्सची गरज सर्वांना पटू लागली. अतुल चिटणीस यांनी मात्र १९८०पासूनच कम्प्युटर तंत्रज्ञानावर हुकुमत मिळविली होती. त्यामुळेच लिनक्स सॉफ्टवेअर तसेच फ्री व ओपन सोर्सचा नारा त्यांनी पुकारला. अतुल यांचे वडील भारतीय , तर आई जर्मनीची. त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षणही बर्लिनमध्ये झाले. त्यानंतर मात्र त्यांचे शिक्षण बेळगाव मिलिटरी स्कूलमध्ये झाले व गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी बीई-मेकॅनिकल केले. वर्षभरातच त्यांचा प्रवास कम्प्युटरनिगडित तंत्रज्ञानाकडे झाला. कम्प्युटरनिगडित अनेक गोष्टींचा प्रथम पुरस्कार त्यांनी केला. मोडेमचा वापर शिकविला. इंटरनेटचा प्रसार होण्यापूर्वीच्या काळात डेटाकम्युनिकेशन ,नेटवर्किंग यांची सुरुवात त्यांनी केली. सीआयएक्स- बुलेटिन बोर्ड सिस्टिम ही भारतातील पहिली ऑनलाइन सेवा त्यांनी सुरू केली. ऑनलाइन संपर्क आणि समूहसंवादाचे ते आद्य माध्यम होते. १९९३ ते १९९७ या काळात त्यांनी पीसी-क्वेस्ट या कम्प्युटरआधारित नियतकालिकातून कम्प्युटरजागृतीचा वसा घेतला. भारत सरकारने बुलेटिन बोर्ड सिस्टिमला करांच्या कक्षेत आणण्याचा घाट घातला असताना चिटणीस यांनी इलेक्ट्रॉनिक चळवळीद्वारे त्यावर प्रहार केले. ही पहिलीच ऑनलाइन चळवळ यशस्वी ठरली. विविध व्यासपीठांवर त्यांनी लिनक्स आणि ओपनसोर्सविषयी जनजागरण केले. २१व्या शतकातील नव्या तंत्रज्ञानानुसार त्यांनी मोबाइल कम्प्युटिंग , कन्व्हर्ज्ड कम्युनिकेशन यांतही उडी घेतली. पीसी क्वेस्टचे सल्लागार संपादक म्हणून विपुल लिखाण केले. ते स्वतः हौशी संगीतकारही होते व संगीताची तंत्रज्ञानाशी सांगड घालण्याचे कसबही त्यांच्या अंगी होते. रेडिओव्हर्व हे इंटरनेट रेडिओ स्टेशन त्यांनी सुरू केले होते. त्यांच्या अकाली निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.  त्यांना कर्करोग झाल्याचे निदान ऑगस्ट २०१२ झाले होते. त्यांचे केमोथेरपीच्या उपचारादरम्यान ३ जून २०१३ रोजी निधन झाले.



ओळख मूलद्रव्यांची भाग-३

ओळख मूलद्रव्यांची भाग-३

सगळ्यात हलकं काय?

हेलिअमपेक्षाही हलका असणारा वायू म्हणजे हायड्रोजन

सगळ्यात हलकं काय, असं कोणी विचारल्यावर आपण पटकन हवा असं म्हणतो. हवेपेक्षाही काय हलकं असू शकतं, असं म्हटल्यावर हवेत वर उडणारे फुगे विशेषत: हेलिअम या वायूचे फुगे आपल्याला आठवतात. खरं तर हेलिअमपेक्षाही हलका असणारा वायू म्हणजे हायड्रोजन! जसं आवर्तसारणीत हायड्रोजननं पहिलं स्थान पटकावलं आहे, तसं हलकं असण्यातही हायड्रोजन या मूलद्रव्यानं पहिलं स्थान पटकावलं आहे. हायड्रोजन हा सगळ्यात हलका वायू असल्यानं त्याने भरलेला फुगा हवेत सोडला तर वर उडेल, हा शोध १७८१ मध्ये इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका इटालियनानं लावला. मग या फुग्यातून लोकांची ने-आण करण्याची कल्पना निघाली. १७८५ साली असाच एक फुगा प्रवाशांना घेऊन उडाला तेव्हा त्याचा स्फोट होऊन त्यातील लोक मृत्यू पावले. साधारणपणे दीडशे वर्षांनंतर १९३७ साली ‘हिडनबर्ग’ नावाचा फुगाही असाच न्यूजर्सी इथे स्फोट होऊन नष्ट झाला. त्यात ३६ जण मृत्युमुखी पडले.
पण प्रश्न पडतो की हायड्रोजन हे मूलद्रव्य सगळ्यात हलकं का आहे? याचं उत्तर हायड्रोजनच्या अणुरचनेत आहे. हायड्रोजन हे असं एकच मूलद्रव्य आहे, ज्याच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन नाही. हायड्रोजन अणूच्या केंद्रकात एक प्रोटॉन आणि अणुकेंद्रकाभोवती फिरणारा एक इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे हायड्रोजन मूलद्रव्याच्या एका अणूचं वस्तुमान १.००८ ऊं  (डाल्टन)आहे. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात संशोधन करणाऱ्या हॅरॉल्ड युरे या रसायनशास्त्रज्ञाने १९३१ साली हायड्रोजनचा एक समस्थानिक शोधून काढला. हायड्रोजनच्या या समस्थानिकाचं नामकरण करण्यात आलं ‘डय़ुटेरिअम.’ डय़ुटेरिअमच्या केंद्रभागी एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन अशी जोडी असते व त्यांच्याभोवती भ्रमण करणारा एक इलेक्ट्रॉन. परंतु एका न्यूट्रॉनमुळे डय़ुटेरिअमचे वस्तुमान सामान्य हायड्रोजनच्या दुप्पट असते. त्यामुळेच डय़ुटेरिअमला ‘हेवी हायड्रोजन’ असंही म्हणतात. डय़ुटेरिअमनंतर लवकरच ट्रिशियम या हायड्रोजनच्या दुसऱ्या समस्थानिकाचा शोध लागला. ट्रिशियमच्या केंद्रभागी एक प्रोटॉन व दोन न्यूट्रॉन असून एकच इलेक्ट्रॉन या त्रिकुटाभोवती भ्रमण करीत असतो.
आधुनिक हायड्रोजन बॉम्बमध्ये डय़ुटेरिअम आणि ट्रिशियम यांचा इंधन म्हणून उपयोग केला जातो. डय़ुटेरिअमपासून तयार केलेल्या जड पाण्याचा वापर अणुभट्टीमध्ये केला जातो, तर हायड्रोजनचा वापर अमोनियानिर्मितीसाठी होतो.
– शुभदा वक्टे        
मराठी विज्ञान परिषदवि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२