सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

गुरुवार, ७ जून, २०१८

दिनविशेष ५ जून

दिनविशेष ५ जून

५ जून- जागतिक पर्यावरण दिवस

आज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाचा इतक्या वर्षांत झालेला र्‍हास पाहुन खरं तर शंका येते हे असे वेगवेगळे दिवस साजरे करुन आपण नक्की काय करतो....कदाचीत असं असेल की नाहीतर यापेक्षा अपरिमीत हानी झाली असती.
मोठी लोकं काही करो न करो, आपण एक सर्वसामान्य नागरिक आणि या पर्यावरणाचे इतके वर्षांचे हानीकारक म्हणून निदान आता तरी जागं व्हावं हे मात्र सर्वांना पटेल..या वर्षी माझ्या मुलाच्या पाळणाघरात संपुर्ण आठवडा Reduce, Reuse and Recycle असा पाळला गेला...खरं एक कशाला सगळेच आठवडे का नाही असे पाळत असं मला आपलं वाटलं पण चला निदान सुरुवात तर आहे...
मुळात जितकं आपण कमी वापरु तितकं त्याचा कचरा कमी..जमेल तिथे हे तत्व पाळणं सोप्पं आहे...खोलीत गरज असतानाच दिवे,पंखे, एसी (एसी शक्य तितका टाळावा हेच उत्तम) आणि बाहेर पडताना वीजेची उपकरणी आठवणीने बंद करणे यात आपण कमी वापरण्याचं तत्व अमलात आणू शकतो. पाण्याचंही तेच. नळाची धार थोडी कमी करावी आणि पिण्यासाठीही पाण्यासारखा धर्म नाही असं असलं तरी पुर्वीचं तांब्या-भांडं तत्व जास्त चांगलं म्हणजे जेवढं हवं तेवढंच पाणी प्यालं जात आणि बाकी उष्टं नं झाल्यामुळे वाया जात नाही...कागदाचा कमी वापर हेही महत्वाचं..मोठ्या रेस्टॉरन्ट्समध्ये रुमाल असतात तिथे पुन्हा पेपर टिश्यु वापरायचं हमखास टाळता येईल. घरीही शक्यतो ओटा पुसायला इ. फ़डकी वापरलीत तर ती धुता येतात किंवा वाटल्यास टाकता येतात. त्यासाठी खास रोज पाच-सहा बाउन्टी कशाला वापरा? शाळेतल्या वह्यांमधल्या उरलेल्या पानांची रफ़ वही बनवणं हेही एक प्रकारे वापरातली एक वही कमी करण्यासाठी मदतच करतं...आता या कमी वापरात आपण फ़क्त वाचवतोय उगाच कंजुषी नाही तर वायफ़ळपणा टाळतोय..असे अनेक उपाय आहे Reduce साठीचे...
Reuse म्हणजे पुन्हा वापरणंही नेहमीच चांगलं. उदा. लहान मुलांना घरी चित्रकला इ. उद्योग करायला पाठकोरे कागद दिले तरी काम होतं. मुळात प्लास्टिकपिशव्या टाळाव्या पण आल्याच तर शक्य असल्यास मग एक-दोनदा त्याच वापराव्यात म्हणजे निदान थोडं गिल्टी फ़िलिंग कमी. माझी आई भाज्या धुतलेलं पाणी नेहमी कुंड्यांमध्ये झाडांना घालते. माझ्या लहानपणापासुन पाहिलेलं पुनर्वापराचं हे सगळ्यात सुंदर आणि सोपं तत्व आहे. तसंच सांडपाण्यावर बागा फ़ुलवणारी एक सोसायटीही मला माहित आहे. मोठ्या लेव्हलवर जमत असेल तर तोही प्रयोग करायला हरकत नाही. 
Recycle करणं केव्हाही चांगलं पण त्यासाठीसुद्धा एनर्जी लागते म्हणून वरची दोन तत्व पाळून जे उरेल आणि शक्य असेल त्याचं रिसायकलिंग करणं हे उत्तम.म्हणजे ते वर म्हटलेले पाठकोरे कागद दोन्ही बाजुनी भरले की मग सुक्या कचर्‍यात टाकावे. नेहमीच ओला आणि सुका कचरा वेगळा करणं चांगलं. आता सगळीकडे तो वेगवेगळा उचलण्याची सोयही आहे. शिवाय एखाद्याचं मोठं घर, पाठी अंगण इ. असेल तर मग ओल्या कचर्‍याचं कंपोस्ट बनवुन त्याचं खत झाडांना वापरणं हेही खूप किफ़ायतशीर ठरु शकेल. अमेरिकेतील काही गावांत एखाद्या मोकळ्या ठिकाणी आपण स्वतः आपला असा कचरा नेऊन कंपोस्ट खताच्या खड्यात नेऊन टाकु शकतो आणि नंतर गरज पडेल तेव्हा तेच खत स्वतःच्या बागेसाठी फ़ुकट घेऊनही येऊ शकतो..खूपच अभिनव कल्पना आहे ही. त्याने रासायनिक खतांचा वापर कमी होऊन पर्यावरण शुद्धीकरणासाठी मदतच होते...
खरं तर या विषयावर जेवढं मांडावं तेवढं कमी आहे..आणि असे एक दिवस साजरे करण्यापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनाला हे वळण लावणं जास्त आवश्यक आहे. आपली नैतिक जबाबदारी म्हणून याचं भान आपण ठेऊया आणि आजच्या पर्यावरण दिवसापासून जमेल तितकं environmental freindly वागायचं ठरवुया.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा