सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

गुरुवार, ७ जून, २०१८

ओळख शास्त्रज्ञांची - हेन्री कॅव्हेंडीश

हेन्री कॅव्हेंडिश

हेन्री कॅव्हेंडिश हे ब्रिटिश रसायन आणि भौतिक शास्त्रज्ञ होते.

हेन्री कॅव्हेंडिश हे ब्रिटिश रसायन आणि भौतिक शास्त्रज्ञ होते. वातावरणातील हवेतील घटकांचं प्रमाण, वायूंचे गुणधर्म, पाण्यातील रासायनिक घटक आणि गुरुत्वाकर्षण या विषयात हेन्री कॅव्हेंडिश यांनी संशोधन केलं. हेन्री कॅव्हेंडिश यांचा जन्म १० ऑक्टोबर १७३१ रोजी फ्रान्समधील नाइसि येथे झाला आणि शिक्षण इंग्लंड येथील केम्ब्रिज विद्यापीठातून झालं. तीन वर्ष शिक्षण घेतल्यावर पदवी न घेताच त्यांनी विद्यापीठ सोडलं पण संशोधन मात्र सुरूच ठेवलं.
हायड्रोजन वायूचा शोध लावताना हायड्रोजनची आणि इतर वायूंची घनता त्यांनी मोजली. हायड्रोजन वायूचं हवेत ज्वलन झालं असता दव म्हणजेच पाण्याचे थेंब तयार होत असल्याचं कॅव्हेंडिश यांनी सिद्ध केलं. पाण्यातील ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं प्रमाण १:२ असतं असं त्यांनी १७४८ मध्ये सिद्ध केलं. नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यातून विद्युत ठिणगी नेली असता नायट्रिक आम्ल तयार होते असा शोध त्यांनी १७८५ मध्ये लावला. हा शोध औद्योगिकदृष्टय़ा उपयुक्त ठरला. गुरुत्वाकर्षण, विद्युत भार यांसारख्या सूक्ष्म प्रेरणा मोजण्यासाठी एक उपकरण त्यांनी तयार केलं. या उपकरणाच्या साहाय्याने १७९८ साली कॅव्हेंडिश यांनी गुरुत्वाकर्षण स्थिरांक मोजला व पृथ्वीची सरासरी घनता काढली. आधुनिक प्रयोगांवरून काढलेली पृथ्वीची घनता आणि कॅव्हेंडिश यांनी काढलेली पृथ्वीची घनता यात केवळ एक टक्क्याचाच फरक आहे. ध्रुवीय प्रकाश, भूविज्ञान, विद्युत अशा विविध विषयांत त्यांनी संशोधन केलं. प्रयोगांतील अचूकता हे त्यांचं वैशिष्टय़ होतं. साखरेच्या किण्वन प्रक्रियेतून निघालेल्या उत्पादकाबद्दल (कार्बन डाय ऑक्साइड वायूबद्दल) त्यांनी संशोधन केलं.कॅल्शियम काबरेनेट आणि कार्बन डायॉक्साइड यांच्या अभिक्रियेत कॅल्शियम बायकाबरेनेट तयार होतं, हा शोध कॅव्हेंडिश यांनी लावला. ही अभिक्रिया परिवर्तनीय (रिव्हर्सबिल) असते. ही अभिक्रिया कठीण पाण्याचं एक कारण आहे. कठीण पाणी कॅल्शियम हायड्रॉक्साइड वापरून मृदू करता येईल, असं संशोधन त्यांनी केलं.
हेन्री कॅव्हेंडिश रॉयल सोसायटीचे सदस्य आणि इन्स्टिटय़ूट ऑफ फ्रान्सचे परदेशीय सदस्य होते. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ केम्ब्रिज येथील एका प्रयोगशाळेला ‘कॅव्हेंडिश फिजिकल लॅबोरेटरी’ असं नाव दिलं आहे. या प्रयोगशाळेत त्यांची बरीच उपकरणं जतन करून ठेवली आहेत.
– अनघा वक्टे        
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा