सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

शनिवार, २ जून, २०१८

बोधकथा- मन मैं है विश्वास


तो वाळवंटात हरवला होता. त्याच्या जवळच पाणी संपलं त्यालाही दोन दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं. हताश होऊन तो सभो वताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता. त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती.  
तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं. तो थबकला. हा भास तर नाही? नाहीतर मृगजळ असेल. पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःच थकलेलं शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता, झोपडी खरोखरच होती. पण ती रिकामी होती, कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून असावी असं वाटत होतं. 
पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला. आणि समोरच दृष्य पाहून तो थबकलाच. माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली.
तिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आलं जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथेच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्याने हातपंप जोराजोरात वरखाली करायला सुरवात केली. पण काहीच झालं नाही. पाणी आलंच नाही. नुसतात पंपाचा आवाज येत राहिला. अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला. आता आपलं मरण त्याला जास्त प्रकर्षाने जाणवले. 
तेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडेे गेलं. परत एक अत्यानंदाची लहर उठली. बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सिल केलेली होती. चटकन तो पुढे सरकला.  त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले. 
त्यावर लिहिले होते "हे पाणी पंप सुरू करण्यासाठी  वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवायला विसरू नका."
तो चक्रावलाच. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. काय करावं? या सुचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं? की सुचनेप्रमाणे करावं?  
समजा, सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर?, पंपाचा पाईप तुटला असेल तर?, खालचं पाणी आटून गेलं असेल तर? पाणी वायाच जाईल... सगळा खेळ खल्लास...
पण सुचना बरोबर असतील तर?... तर भरपूर पाणी...
पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याच मत ठरेना. 
शेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातांनी त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वरखाली करायला सुरवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरवात झाली. भरपूर पाणी येतं होतं. त्याला काय करू नी काय नको असं झालं. ढसाढसा पाणी प्यायला तो. स्वतः जवळच्या बाटल्या पण काठोकाठ भरल्या त्याने. तो खुप खुश झाला होता. 
शांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून सहज लक्षात येत होतं की तो मानवी वस्तीपासून अजून खुप दूर होता. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती.
त्याने निघायची तयारी केली. सुचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली. 
आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहीली. "विश्वास ठेवून हे पाणी पंपात ओता, पाणी येतच" आणि तो पुढे निघाला. 
----
तात्पर्य- ही गोष्ट आहे देण्याचं महत्व सांगणारी. काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी. काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं, आनंददायी असतं. 
त्याही पेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते.  विश्वासाने केलेले दान खुप आनंद देते. 
आपल्या कृतीमुळे फायदा होईल याची खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला. 
काय होईल माहिती नसताना त्याने विश्वासाने अज्ञातात उडी मारली. 
या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी. 
त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या.

-संग्रहीत

ओळख मूलद्गव्यांची भाग - २

ओळख मूलद्रव्यांची भाग - २

सर्व सारख्याच प्रकारचे अणू एकत्र येऊन ‘मूलद्रव्य’ तयार होतं. अणूमध्ये न्यूट्रॉन्स, प्रोटोन्स आणि इलेक्ट्रॉन्स असतात. प्रत्येक मूलद्रव्यात न्यूट्रॉन्सची संख्या वेगवेगळी असू शकते, पण प्रोटोन्सची संख्या मात्र नेमकी असते. एखाद्या मूलद्रव्यात जितके प्रोटोन्स असतील त्यानुसार त्यांना अणुक्रमांक दिला जातो. उदाहरणार्थ, हायड्रोजन या मूलद्रव्याच्या अणूमध्ये एक प्रोटोन असतो म्हणून त्याचा अणुक्रमांक एक आहे; कार्बनच्या अणूमध्ये सहा प्रोटोन्स असतात म्हणून त्याचा अणुक्रमांक सहा असतो. तर लोखंड या सर्वपरिचित मूलद्रव्याचा अणुक्रमांक आहे २६ कारण त्याच्या अणूमध्ये २६ प्रोटोन्स असतात.
दिमित्री मेंडेलीवने, एका तक्त्यामध्ये चढत्या अणुक्रमांकाने मूलद्रव्यांची मांडणी केली. अशी मांडणी करताना काही ठरावीक क्रमांकांनंतर येणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये त्याला साम्य आढळलं. म्हणून संपूर्ण तक्त्याची रचना अशी केली कीसाम्य असणारी सर्व मूलद्रव्ये एका गटात येतील. त्यामुळे गटांनुसार मूलद्रव्यांचा अभ्यास करणं आणि त्यांचा व्यवहारात उपयोग करणं खूप सहज शक्य झालं.
दिमित्री मेंडेलीव याने तयार केलेल्या ‘आवर्तसारणी’त आजपर्यंत माहीत झालेली ११८ मूलद्रव्यं अगदी चपखलपणे बसली आहेत. हे झालं ११८ मूलद्रव्यांच्या मांडणीबद्दल! पण आपल्या सगळ्यांच्या मनात मूलद्रव्यांबद्दल अनेक प्रश्न येतात. ही ११८ मूलद्रव्यं आहेत तरी कोणती? त्यांची नावं काय? त्या प्रत्येकाचे खास असे गुणधर्म कोणते? त्यांचा आपल्या आयुष्याशी काही संबंध आहे का? त्यांचा आपल्याला काही उपयोग आहे का? आणि तो कसा? यापेक्षाही आणखी मनोरंजक माहिती म्हणजे ही मूलद्रव्यं मुळात निर्माणच कशी झाली? आणि जर कुठे न कुठे नैसर्गिकरीत्या तयार झाली असतील तर ती माणसाच्या लक्षात कधी आणि कशी आली? थोडक्यात या मूलद्रव्यांचा शोध कसा लागला? आणि त्यांना नावं कशी दिली जातात? मूलद्रव्य जिथे आढळतात. त्या भूभागावरून, की त्यांच्या रंगावरून की त्यांना शोधणाऱ्या संशोधकाच्या नावावरून की त्यांच्या गुणधर्मावरून?चला तर निघू या अणुक्रमांकांच्या चढत्या क्रमानुसार, मूलद्रव्यांच्या सफरीला!!
– डॉ. मानसी राजाध्यक्ष           
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

ओळख मूलद्गव्यांची भाग - १

ओळख मूलद्रव्यांची -भाग १
रासायनिक रचनेला अनुसरून मूलद्रव्र्यामध्ये काही साम्यं दिसतात तर कधी काही वेगळेपण! तेव्हा सर्व मूलद्रव्यांचे स्वभाव विशेष लक्षात घेऊन त्यांना ‘सारणीबद्ध’ केलं गेलंय. जसजशी माणसाला नवनवी मूलद्रव्यं ज्ञात व्हायला लागली तसतशी त्याने त्यांची मांडणी करायला सुरुवात केली. पुढे पुढे अनेक नवी मूलद्रव्यं आणि आधी माहीत असलेल्या मूलद्रव्यांचे अनके नवीन गुणधर्म शोधले जायला लागले, तेव्हा त्यांच्या मांडणीत सुधारणा व्हायला लागल्या.‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीच्याच धर्तीवर आपण ‘मूलद्रव्यं तितके गुणधर्म’ असंही म्हणू शकतो. प्रत्येक मूलद्रव्याला स्वत:चं असं खास गुणधर्म असतात. त्यामुळेच तर त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या अभिक्रियेतून हजारो प्रकारची विविध रसायनं तयार होतात. आणि या अनेकविध रसायनांनी हे अफाट विश्व व्यापलेलं आहे, असं असलं तरी बुद्धिमान माणसाने आपल्या सोयीसाठी सर्व ज्ञात मूलद्रव्यांना ‘सात बाय अठरा’च्या कोष्टकात बसवून टाकलंय. आपल्या घरामध्ये आपल्याला एखादी वस्तू सहजी मिळावी आणि त्यांचा योग्य वेळी योग्य असा वापर करता यावा म्हणून एक शिस्तबद्ध मांडणी केलेली असते. स्वयंपाकघरात वाटय़ा, पेले, मसाल्यांचे पदार्थ, पिठं, धान्यं यांच्यातले वेगळे गुणधर्म आणि त्यांच्यात असलेलं साम्य अशा दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन त्यांची शिस्तबद्ध रचना केलेली असते; तर कपाटामध्ये रोजचे कपडे, लग्नकार्याचे कपडे, थंडीचे कपडे यांचेही साम्य आणि फरक समजून घेऊन, ते रचले जातात. तीच गत मुलद्रव्यांची!
एकोणिसाव्या शतकात रशियन संशोधक दिमित्री मेंडेलीव याने मात्र मुलद्रव्यांची नुसती मांडणी न करता, त्यांची ‘आवर्त सारणी’ (पिरिऑडिक टेबल) तयार केलं. काही ठरावीक कालावधीने काही ठरावीक मूलद्रव्यं सारखेच गुणधर्म दाखवतात हे समजून घेत, म्हणजेच मूलद्रव्यांच्या गुणधर्माचे आवर्ती स्वरूप लक्षात घेत, मेंडेलीवने ही अत्यंत कल्पक अशी मूलद्रव्यांची मांडणी केली, ज्यामध्ये पुढच्या शोधांची भर घालत, आजही तीच ‘आवर्तसारणी’ मूलद्रव्यांच्या माहितीसाठी अचूकपणे वापरता येतेय. गेल्या काही दशकात विसाहून जास्त मानवनिर्मित मूलद्रव्यांचा जन्म झाला आहे. त्यानाही या आवर्तसारणीत यथायोग्य स्थान दिलं गेलं आहे. आजच्या घटकेला आवर्तसारणीत ११८ मूलद्रव्यं आहेत.
– डॉ. मानसी राजाध्यक्ष           
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष - १ जून

टाटा मूलभूत संशोधन संस्था  (विज्ञान संशोधन संस्था)

स्थापना - १ जुन १९४५

टाटा मूलभूत संशोधन संस्था "(इंग्लिश-टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च)" या संस्थेची स्थापना १९४५ साली जे. आर. डी. टाटा आणि डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या पुढाकाराने मुंबई येथे झाली. १९६२ साली दक्षिण मुंबईतील नेव्ही नगर परिसरात या संस्थेचे स्थलांतर करण्यात आले. देशातील आजपर्यंतचे अनेक नामवंत शास्त्रज्ञ याच संस्थेतून घडलेले आहेत. आज संस्थेच्या तीन मुख्य विद्याशाखेतून ४०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ संस्थात्मक संशोधन आणि मार्गदर्शन करतात. या तीन शाखांमध्ये विश्वकिरण-आवकाशातून येणारे अतिशय भेदक किरण, उच्चउर्जा भौतिकी व गणिती यांचा समावेश होतो. मुंबईची देवनार येथील होमी भाभा सेंटर फॉर सायन्स अँड एज्युकेशन, पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, बेंगलूरची इंटरनॅशनल सेंटर फॉर थेरॉटिकल सायन्सेस आणि नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसया संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्याच कार्याचा भाग आहेत. या संस्थेचे ग्रंथालय भारतातील सर्वांत मोठे ग्रंथालय असल्याचे सांगितले जाते.

संस्थेची उद्दिष्टे

पदार्थ विज्ञानामधील नवनवीन शाखांमध्ये संशोधन करणे. मानवी ज्ञानाच्या विस्तारलेल्या कक्षात संशोधन करून वैज्ञानिक प्रगती साध्य करण्यासाठी हुशार भारतीय तरुणांना त्यादृष्टीने प्रशिक्षण देणे.

दिनविशेष - २ जून

देवेंद्र मोहन बोस- पदार्थवैज्ञानिक, वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधन

स्मृतिदिन - २ जुन १९७५

देवेन्द्र मोहन बोस (२६ नोव्हेंबर १८८५ - २ जून १९७५) हे एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (पदार्थवैज्ञानिक) होते. त्यांनी वैश्विक किरण , कृत्रिम किरणोत्सर्ग (artifitial radioactivity) आणि न्यूट्रॉन फिजिक्सच्या क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले. त्या्नी बोस इन्स्टिट्यूटला सर्वात प्रदीर्घ सेवा दिली (१९३८-१९६७) होते. त्यांनी इंडियन सायन्स न्यूज असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम केले. आणि सुमारे २५ वर्षांपासून ते जर्नल सायन्स अँड कल्चर या वृत्तपत्राचे संपादक होते. त्यांनी विश्वभारती विद्यापीठाचे खजिनदार म्हणून काम केले.