ओळख मूलद्रव्यांची भाग - २

सर्व सारख्याच प्रकारचे अणू एकत्र येऊन ‘मूलद्रव्य’ तयार होतं. अणूमध्ये न्यूट्रॉन्स, प्रोटोन्स आणि इलेक्ट्रॉन्स असतात. प्रत्येक मूलद्रव्यात न्यूट्रॉन्सची संख्या वेगवेगळी असू शकते, पण प्रोटोन्सची संख्या मात्र नेमकी असते. एखाद्या मूलद्रव्यात जितके प्रोटोन्स असतील त्यानुसार त्यांना अणुक्रमांक दिला जातो. उदाहरणार्थ, हायड्रोजन या मूलद्रव्याच्या अणूमध्ये एक प्रोटोन असतो म्हणून त्याचा अणुक्रमांक एक आहे; कार्बनच्या अणूमध्ये सहा प्रोटोन्स असतात म्हणून त्याचा अणुक्रमांक सहा असतो. तर लोखंड या सर्वपरिचित मूलद्रव्याचा अणुक्रमांक आहे २६ कारण त्याच्या अणूमध्ये २६ प्रोटोन्स असतात.
दिमित्री मेंडेलीवने, एका तक्त्यामध्ये चढत्या अणुक्रमांकाने मूलद्रव्यांची मांडणी केली. अशी मांडणी करताना काही ठरावीक क्रमांकांनंतर येणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये त्याला साम्य आढळलं. म्हणून संपूर्ण तक्त्याची रचना अशी केली कीसाम्य असणारी सर्व मूलद्रव्ये एका गटात येतील. त्यामुळे गटांनुसार मूलद्रव्यांचा अभ्यास करणं आणि त्यांचा व्यवहारात उपयोग करणं खूप सहज शक्य झालं.
दिमित्री मेंडेलीव याने तयार केलेल्या ‘आवर्तसारणी’त आजपर्यंत माहीत झालेली ११८ मूलद्रव्यं अगदी चपखलपणे बसली आहेत. हे झालं ११८ मूलद्रव्यांच्या मांडणीबद्दल! पण आपल्या सगळ्यांच्या मनात मूलद्रव्यांबद्दल अनेक प्रश्न येतात. ही ११८ मूलद्रव्यं आहेत तरी कोणती? त्यांची नावं काय? त्या प्रत्येकाचे खास असे गुणधर्म कोणते? त्यांचा आपल्या आयुष्याशी काही संबंध आहे का? त्यांचा आपल्याला काही उपयोग आहे का? आणि तो कसा? यापेक्षाही आणखी मनोरंजक माहिती म्हणजे ही मूलद्रव्यं मुळात निर्माणच कशी झाली? आणि जर कुठे न कुठे नैसर्गिकरीत्या तयार झाली असतील तर ती माणसाच्या लक्षात कधी आणि कशी आली? थोडक्यात या मूलद्रव्यांचा शोध कसा लागला? आणि त्यांना नावं कशी दिली जातात? मूलद्रव्य जिथे आढळतात. त्या भूभागावरून, की त्यांच्या रंगावरून की त्यांना शोधणाऱ्या संशोधकाच्या नावावरून की त्यांच्या गुणधर्मावरून?चला तर निघू या अणुक्रमांकांच्या चढत्या क्रमानुसार, मूलद्रव्यांच्या सफरीला!!
– डॉ. मानसी राजाध्यक्ष
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा