ओळख मूलद्रव्यांची -भाग १

रासायनिक रचनेला अनुसरून मूलद्रव्र्यामध्ये काही साम्यं दिसतात तर कधी काही वेगळेपण! तेव्हा सर्व मूलद्रव्यांचे स्वभाव विशेष लक्षात घेऊन त्यांना ‘सारणीबद्ध’ केलं गेलंय. जसजशी माणसाला नवनवी मूलद्रव्यं ज्ञात व्हायला लागली तसतशी त्याने त्यांची मांडणी करायला सुरुवात केली. पुढे पुढे अनेक नवी मूलद्रव्यं आणि आधी माहीत असलेल्या मूलद्रव्यांचे अनके नवीन गुणधर्म शोधले जायला लागले, तेव्हा त्यांच्या मांडणीत सुधारणा व्हायला लागल्या.‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीच्याच धर्तीवर आपण ‘मूलद्रव्यं तितके गुणधर्म’ असंही म्हणू शकतो. प्रत्येक मूलद्रव्याला स्वत:चं असं खास गुणधर्म असतात. त्यामुळेच तर त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या अभिक्रियेतून हजारो प्रकारची विविध रसायनं तयार होतात. आणि या अनेकविध रसायनांनी हे अफाट विश्व व्यापलेलं आहे, असं असलं तरी बुद्धिमान माणसाने आपल्या सोयीसाठी सर्व ज्ञात मूलद्रव्यांना ‘सात बाय अठरा’च्या कोष्टकात बसवून टाकलंय. आपल्या घरामध्ये आपल्याला एखादी वस्तू सहजी मिळावी आणि त्यांचा योग्य वेळी योग्य असा वापर करता यावा म्हणून एक शिस्तबद्ध मांडणी केलेली असते. स्वयंपाकघरात वाटय़ा, पेले, मसाल्यांचे पदार्थ, पिठं, धान्यं यांच्यातले वेगळे गुणधर्म आणि त्यांच्यात असलेलं साम्य अशा दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन त्यांची शिस्तबद्ध रचना केलेली असते; तर कपाटामध्ये रोजचे कपडे, लग्नकार्याचे कपडे, थंडीचे कपडे यांचेही साम्य आणि फरक समजून घेऊन, ते रचले जातात. तीच गत मुलद्रव्यांची!
एकोणिसाव्या शतकात रशियन संशोधक दिमित्री मेंडेलीव याने मात्र मुलद्रव्यांची नुसती मांडणी न करता, त्यांची ‘आवर्त सारणी’ (पिरिऑडिक टेबल) तयार केलं. काही ठरावीक कालावधीने काही ठरावीक मूलद्रव्यं सारखेच गुणधर्म दाखवतात हे समजून घेत, म्हणजेच मूलद्रव्यांच्या गुणधर्माचे आवर्ती स्वरूप लक्षात घेत, मेंडेलीवने ही अत्यंत कल्पक अशी मूलद्रव्यांची मांडणी केली, ज्यामध्ये पुढच्या शोधांची भर घालत, आजही तीच ‘आवर्तसारणी’ मूलद्रव्यांच्या माहितीसाठी अचूकपणे वापरता येतेय. गेल्या काही दशकात विसाहून जास्त मानवनिर्मित मूलद्रव्यांचा जन्म झाला आहे. त्यानाही या आवर्तसारणीत यथायोग्य स्थान दिलं गेलं आहे. आजच्या घटकेला आवर्तसारणीत ११८ मूलद्रव्यं आहेत.
– डॉ. मानसी राजाध्यक्ष
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा