ओळख मूलद्रव्यांची भाग - २७
क्लोरीन
कधी कधी तरणतलावात पोहून आल्यावर डोळे चुरचुरल्यासारखे वाटलेत?

कधी कधी तरणतलावात पोहून आल्यावर डोळे चुरचुरल्यासारखे वाटलेत? किंवा कधी नळातून येणाऱ्या पाण्याला कसला उग्र भपकारा वाटला आहे? ही आहे क्लोरीन वायूची किमया! अणूक्रमांक १७ असलेले क्लोरीन मूलद्रव्याचे स्थान आवर्तसारणीत तिसऱ्या आवर्तनात आणि १७ व्या गणात आहे. सामान्य तापमानाला क्लोरीन वायू हिरवट पिवळ्या रंगाचा असतो. पाणी शुद्ध करण्यासाठी या वायूचा वापर गेली अनेक वष्रे/ दशके केला जात आहे. अगदी सन १९०० पासून पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी व सन १९२० पासून तरणतलावातील पाणी शुद्ध ठेवण्यासाठी क्लोरीन वायू वापरला जातो.
अशा या वायूचा शोध १७७४ साली कार्ल विल्यम शील या शास्त्रज्ञाने लावला. हायड्रोक्लोरिक आम्ल हे पाय्रोलुझाईट (मँगेनीज डाय ऑक्साइड) बरोबर तापवल्यानंतर या पिवळसर हिरव्या दाट वायूची निर्मिती झाली; त्याच्या वासाने गुदमरल्यासारखे झाले असे निरीक्षण त्याने केले. तसेच या वायूने लिटमस कागद, पाने, फुले रंगहीन होतात. कार्ल शीलने क्लोरीन वायूचा हा विरंजक (ब्लीचिंग) गुणधर्मही नोंदवून ठेवला. हंफ्री डेव्ही यांनीही क्लोरीनवर काही प्रयोग केले आणि १८१० मध्ये क्लोरीन हे संयुग नसून मूलद्रव्य आहे असा निष्कर्ष काढला. क्लोरीनच्या हिरवट पिवळ्या रंगावरून, क्लोरो या ग्रीक शब्दावरून या मूलद्रव्याला क्लोरीन हे नाव दिले.क्लोरीन निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही. हॅलाइट (सोडिअम क्लोराइट) हे क्लोरीन मिळण्याचे मुख्य खनिज. कार्नालाईट (मॅग्नेशिअम पोटॅशिअम क्लोराइड) आणि सिल्वाइट (पोटॅशिअम क्लोराइड) या खनिजामधूनही क्लोरीन मिळते. आपल्या रोजच्या वापरातले मीठ हे सोडियम व क्लोरीन यांचे संयुग आहे. मानवी शरीरात एक दाहक आम्ल असते ते म्हणजे मानवाच्या पोटात असलेले हायड्रोक्लोरिक आम्ल. हायड्रोजन आणि क्लोरीनचे हे संयुग आपल्या अन्नपचनास मदत करते. शरीरातील मीठ (सोडीयम क्लोराइड आणि पोटॅशियम क्लोराइड) आपल्या चेता संस्थेला कार्यक्षम ठेवते. अत्यंत सूक्ष्म प्रमाणात झाडांनाही त्याची आवश्यकता असते. अन्यथा पाने पिवळी पडू शकतात. क्लोरीन हा वायू अत्यंत क्रियाशील असल्याने फक्त निष्क्रिय वायू सोडून सगळ्यांशी संयुगे करतो.
– डॉ. कविता रेगे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा