सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

गुरुवार, २८ जून, २०१८

ओळख मूलद्रव्यांची भाग - २९ - पोटॅशिअम

पोटॅशिअम ( पलाश )

या मूलद्रव्याचा शोध सर हम्फ्रे डेव्ही यांना १८०७ साली, इंग्लंडमध्ये लागला.

पलाश (पोटॅशिअम) हे आवर्तसारणीतील चौथ्या आवर्तनातील पहिल्या गणातील १९ अणुक्रमांक असलेले मूलद्रव्य. हे मूलद्रव्य ङ या प्रतीकाने दर्शविण्यात येते. लॅटिन शब्द kalium पासून K ही संज्ञा तयार झाली. या मूलद्रव्याचा शोध सर हम्फ्रे डेव्ही यांना १८०७ साली, इंग्लंडमध्ये लागला.
सॉल्ट पीटर (पोटॅशिअम नायट्रेट), तुरटी (पोटॅशिअम अ‍ॅल्युमिनिअम सल्फेट) आणि पोटॅश (पोटॅशिअम काबरेनेट) हे पोटॅशिअमचे क्षार अनेक शतकांपासून ज्ञात होते. पोटॅशिअम हा शब्द पोटॅश (pot + ash) या शब्दापासून तयार झाला. पोटॅशिअम वापरासाठी उपलब्ध व्हावा म्हणून एखाद्या भांडय़ात पाणी घेऊन त्यात पोटॅशिअमचे क्षार किंवा वनस्पतींची राख मिसळली जात असे. पूर्वी पोटॅशिअम काबरेनेट झाडांच्या राखेपासून मिळवून त्याचा उपयोग साबणात केला जात होता.
सर हम्फ्रे डेव्ही यांनी विद्युत अपघटन पद्धतीने कॉस्टिक पोटॅश (KOH) मधून पोटॅशिअम वेगळा करण्यात यश मिळविले. पोटॅशिअम हा पहिला धातू, जो विद्युत अपघटन पद्धत वापरून वेगळा केला. त्यानंतर त्याच वर्षी हीच पद्धत हम्फ्रे डेव्ही यांनी सोडिअम धातूसाठीही वापरली.
पोटॅशिअम हा सामान्य तापमानाला मऊ, चाकूने कापता येणारा, चांदीसारखा दिसणारा क्रियाशील धातू! शून्य अंश सेल्सिअस तापमानाला पोटॅशिअम कठीण व ठिसूळ होतो. हा अल्कली धातू हवेच्या संपर्कात आला असता ऑक्सिडेशन होऊन काळा पडतो. तसेच पाण्याच्या संपर्कात आला असता रासायनिक अभिक्रिया होऊन दाहक असे पोटॅशियम हायड्रॉक्साइड आणि हायड्रोजन तयार होते, त्याचप्रमाणे या अभिक्रियेत उष्णता उत्सर्जति होते.पोटॅशिअम समुद्राच्या पाण्यात आणि बऱ्याचशा खनिजांमध्ये सापडतो. निसर्गात पोटॅशिअमची तीन समस्थानिके आढळतात. त्यापैकी 40K हा किरणोत्सारी आहे.
आपल्या शरीरात आढळणारा पोटॅशिअम, पेशींच्या कार्यासाठी उपयुक्त असा घटक आहे. मज्जातंतूंच्या आपसांतील संदेश देवाणघेवाण करण्यात पोटॅशियम आयन-हस्तांतरण ही एक आवश्यक क्रिया आहे. तसेच हृदयाचे ठोके नियंत्रित करणे यासारखे अतिमहत्त्वाचे कार्य पोटॅशिअममुळे होते. त्यामुळेच पोटॅशिअमची शरीरातील कमतरता किंवा अतिरिक्त पातळी ही हानीकारक ठरू शकते. ताजी फळे आणि भाज्या हा पोटॅशिअमचा सर्वात योग्य स्रोत आहे.
पाण्यात विरघळण्याची पुरेपूर क्षमता असल्याने पोटॅशिअमचा वापर साबणात केलेला आढळतो. तसेच रासायनिक खतांमध्येही पोटॅशिअमचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो.
– ललित गायकवाड
मराठी विज्ञान परिषदवि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा