ओळख मूलद्रव्यांची भाग - २८
अरगॉन
अरगॉन हा रंगहीन व गंधहीन वायू असून त्याचा अणुक्रमांक १८ आहे.

अरगॉन हा रंगहीन व गंधहीन वायू असून त्याचा अणुक्रमांक १८ आहे. आवर्तसारणीत अरगॉनचा समावेश निष्क्रिय मूलद्रव्यांच्या १८व्या गणात केला जातो. या गणातील सर्व मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनचे अष्टक (हेलियमच्या बाहेरच्या कक्षेत केवळ दोन इलेक्ट्रॉन असतात.) पूर्ण असल्याने सर्व मूलद्रव्ये रासायनिकदृष्टय़ा स्थिर आणि अक्रियाशील असतात. त्यामुळे या मूलद्रव्यांना ‘निष्क्रिय’ म्हणतात.
अरगॉन वायूच्या शोधाचा इतिहास जाणून घेण्यासारखा आहे. खरं तर १७८५ साली हेन्री कॅव्हेंडिश यांना पृथ्वीच्या वातावरणातील हवेचा काही भाग अक्रियाशील असल्याचा अंदाज आला होता. तेव्हा त्यांनी हवेपासून एक वायू वेगळा केला आणि तो वायू (सुमारे १ टक्का) कोणत्याही परिस्थितीत क्रियाशील नसतो, हेही त्यांच्या लक्षात आले. मात्र तो वायू अरगॉन आहे हे त्यांना माहीत नव्हते.
अरगॉनचा शोध १८९४ साली लॉर्ड रॅली आणि सर विल्यम रॅम्झी यांनी लावला. केवळ हवेच्या नमुन्यापासून नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बनडाय ऑक्साइड इत्यादी घटक त्यांनी काढून टाकले आणि अरगॉन वायू पहिल्यांदा वेगळा केला. मात्र हेन्री कॅव्हेंडिश आणि रॅली-रॅम्झी यांच्या संशोधनात तब्बल शंभर वष्रे लोटली. अरगॉन वायूचा शोध लागण्यामागे नायट्रोजन वायू कारणीभूत होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रयोगशाळेत रॅली-रॅम्झी यांना असे आढळून आले की, नायट्रोजनच्या संयुगांपासून मिळविलेला नायट्रोजन हा हवेपासून मिळविलेल्या नायट्रोजनच्या तुलनेत सुमारे ०.५ टक्के हलका असतो. वास्तविक पाहता, हा फरक खूपच कमी होता, तरी रॅली-रॅम्झी यांनी त्यामागील वस्तुस्थिती शोधण्यासाठी काही महिने घालविले. त्यांनी असा निष्कर्ष काढला की, हवेतील आणखी एखादा वायू नायट्रोजनमध्ये मिसळलेला असावा. कॅव्हेंडिश यांच्यासारखीच पद्धत वापरून रॅली-रॅम्झी यांनी अरगॉन मिळविला. त्यांनी प्रथम हवेतील ऑक्सिजन वेगळा करण्यासाठी तापलेल्या कॉपरवरून (तांबे) हवा जाऊ दिली आणि उरलेल्या वायूची मॅग्नेशियमबरोबर नायट्रोजन वायूची अभिक्रिया घडवून मॅग्नेशियम नायट्राइडच्या स्वरूपात नायट्रोजन वेगळा करून अरगॉन मिळविला. नंतर वेगवेगळ्या चाचण्यांमधून अरगॉन वायू अक्रियाशील असल्याचे स्पष्ट झाले. अरगॉन या ग्रीक भाषेतील शब्दाचा अर्थ ‘आळशी’ असा होतो. हा वायू अक्रियाशील असल्याने या वायूला ‘अरगॉन’ असे नाव पडले.
विजय ज्ञा. लाळे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा