ओळख मूलद्रव्यांची भाग - ३२
टिटॅनिअम
चौथ्या आवर्तनातील आणि चौथ्या गणात स्थान असलेले टिटॅनिअम या मूलद्रव्याचा अणुक्रमांक २२ आहे.

चौथ्या आवर्तनातील आणि चौथ्या गणात स्थान असलेले टिटॅनिअम या मूलद्रव्याचा अणुक्रमांक २२ आहे. या चंदेरी रंगाच्या धातूची खासियत म्हणजे फार कमी घनता पण खूप जास्त ताकद. कमी घनता म्हणजे वजन कमी. टिटॅनिअमची ताकद स्टीलहून थोडी जास्तच असते, पण वजन म्हणाल तर स्टीलच्या निम्मे. असा धातू विमानामध्ये नाही वापरला तरच नवल. अहो, त्यामुळेच तर हा धातू – जो १९६० च्या सुमारास बोइंग विमानात फक्त दोन टक्के वापरला जात होता तो – आजच्या घडीला १५ टक्क्यांपर्यंत वापरला जातो. तसेच हेलिकॉप्टर, एअरबस, अंतराळयान अशा सर्व प्रकारच्या निर्मितीत टिटॅनिअमने स्थान मिळवलेले आहे.
१७९१ मध्ये विल्यम ग्रेगोर यांना इल्मेनाइट या खनिजामध्ये नवीन मूलद्रव्य असल्याचे आढळले. काळ्या रंगाच्या वाळूच्या स्वरूपातील हे खनिज चुंबकीय गुणधर्म दाखवत होते. यात लोह आणि टिटॅनिअम या दोन मूलद्रव्यांचे ऑक्साइड्स असल्याचे त्यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले. त्यानंतर १७९५ मध्ये जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टनि क्लाप्रोथ यांनी स्वतंत्रपणे या धातूचा शोध लावला. असे असले तरी तो खनिजापासून पूर्णपणे वेगळा काढण्याचे श्रेय जाते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ मेंथू हंटर यांस, ज्यांनी १९१० मध्ये टिटॅनिअम क्लोराइडपासून टिटॅनिअम वेगळे करता येईल हे दाखवून दिले होते. ग्रीक पुराणकथेचा संदर्भ घेऊन क्लाप्रोथनी याचे नामकरण ‘टिटॅनिअम’ असे केले.टिटॅनिअम हा धातू फार क्रियाशील असल्याने तो खनिजापासून वेगळा मिळवणे तसे जिकिरीचे आहे. म्हणूनच प्रयोगशाळेतल्या छोटय़ा प्रमाणामधून बाहेर येत, उद्योगांमध्ये लागणाऱ्या मोठय़ा प्रमाणात त्याला वेगळा करण्याचे काम १९३० साली लक्झेम्बर्गच्या विल्यम जस्टीन क्रोल या धातुशास्त्रज्ञाने केले, त्याच्याच नावाने ही क्रोल पद्धत म्हणून आजही ओळखली जाते आणि वापरलीही जाते. जसे टिटॅनिअम मोठय़ा प्रमाणावर क्रोल पद्धतीने वेगळे करण्यास सुरुवात झाली, तसे लगेच त्याचा सर्वप्रथम उपयोग दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत आणि अमेरिकन दोन्ही सन्यादलांनी त्यांच्या विमानांमध्ये करून घेतला.
पृथ्वीतलावर जे अनेक धातू मिळतात त्यात टिटॅनिअमचा क्रमांक बराच वरचा आहे. हा धातू भारतात तमिळनाडू, ओदिशा आणि आंध्र प्रदेश या भागांत सापडतो.
– डॉ. विद्यागौरी लेले
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा