ओळख मूलद्रव्यांची - भाग - ३० - - कॅल्शिअम
‘टु बी इन लाइमलाइट’
सध्याच्या काळात ‘टु बी इन लाइमलाइट' म्हणजेच ‘प्रकाशझोतात असणे’ फार महत्त्वाचे मानले जाते.

सध्याच्या काळात ‘टु बी इन लाइमलाइट’ म्हणजेच ‘प्रकाशझोतात असणे’ फार महत्त्वाचे मानले जाते. पण ‘लाइमलाइट’ का? या प्रश्नाचे उत्तर मनोरंजक आहे. रंगभूमीवर नाटय़प्रयोगावेळी लागणारी प्रकाशयोजना करताना गॅसबत्ती वापरत असत. परंतु हवा तितका प्रकाश उपलब्ध होत नसे व आवश्यक नाटय़मयता साकारता येत नसे. अशा वेळी ऑक्सी-हायड्रोजन ज्योतीवर क्विक लाइम म्हणजेच कॅल्शियम ऑक्साइड जाळून प्रखर पांढरा प्रकाश स्पॉटलाइट म्हणून वापरला गेला. म्हणून असा प्रकाश लाइमलाइट झाला. १८३७ साली लंडनच्या कोवेंट गार्डन थिएटर येथे अशा वापराची प्रथम नोंद आहे. कॅल्शियम या मूलद्रव्याची अनेक संयुगे लाइम शब्दाशी निगडित आहेत. जसे क्विक लाइम (CaO), स्लेकेड लाइम (Calcium Hydroxide), लाइमस्टोन (Calcium Carbonate), सल्फेट ऑफ लाइम (Calcium Sulfate) इत्यादी. अणुक्रमांक २० असलेला हा चंदेरी रंगाचा धातू स्वभावत: अगदी अस्थिर आहे. याचा अर्थ मूलरूपात राहण्यापेक्षा संयुगरूपात राहणे त्याला अधिक मानवते. या मूलद्रव्याची चोवीस समस्थानिके ज्ञात आहेत. अणुभार ३४ ते ५७ अशी ही समस्थानिके आहेत. पकी अणुभार ४० समस्थानिके सर्वात स्थिर आणि किरणोत्सारी नसणारे असे आहे. इतर सर्व समस्थानिके किरणोत्सारी आहेत. अर्धायुष्य लक्षात घेता ३४ अणुभार असणारे कॅल्शियमचे समस्थानिक३४उं सर्वात अस्थिर (३५ नॅनोसेकंद) तर ४१ अणुभार असणारे कॅल्शियमचे समस्थानिक ४१ Ca सर्वात स्थिर (१,०२,००० वर्षे) म्हणता येईल. पृथ्वीच्या कवचातील (ऑक्सिजन, सिलिकॉन, अॅल्युमिनिअम, लोह नंतर); सागरात (सोडिअम-क्लोराइड, मॅग्नेशियम-सल्फेट यांनंतर) व मानवी शरीरात (ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन नायट्रोजन नंतर) विपुल असे कॅल्शियम आणि त्याची सर्व संयुगे तमाम जीवसृष्टीसाठी अतिशय आवश्यक आहेत. या मूलद्रव्याची लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे इतर अनेक धातुरूपातील मूलद्रव्यांपेक्षा याची धातू म्हणून उपयुक्तता मर्यादित आहे. लिथियम, सोडिअम, पोटॅशिअम इत्यादींप्रमाणे अतिशय क्रियाशील असल्यामुळे याची संयुगे अधिक आहेत. मानवी शरीरातील ९९ टक्के कॅल्शियम हे हाडांमध्ये व दातांमध्ये आढळते. रक्ताभिसरणासाठी, स्नायूंच्या हालचालींसाठी संप्रेरके मुक्त करण्यासाठी तसेच मेंदूपासून शरीरातील अन्य अवयवांपर्यंत संदेशवहनासाठी कॅल्शियमची महत्त्वाची भूमिका असते.
-डॉ. रवींद्र देशमुख
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा