दिनविशेष २४ जुलै
राॅबर्ट लेडली - (Robert Ledley)
सिटी स्कॅन संशोधन - (Comuted Tomography scan)
स्मृतिदिन - २४ जुलै २०१२
सीटी म्हणजे कॉम्प्युटराइज्ड एक्सियल टोमोग्राफी (सीएटीसुद्धा म्हणतात).. सीटी स्कॅन ही तंत्रप्रणाली एक्स-रेचा पुढचा टप्पा आहे. एक्स-रेमध्ये एकाच दिशेने क्ष-किरण सोडले जाऊन त्या माध्यमातून शरीराच्या विशिष्ट भागाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे एक्स-रेच्या माध्यमातून न्युमोनिआ, अस्थिभंग अशा हाडांशी संबंधित आजारांचे निदान करणे शक्य आहे.
मानवी शरीररचना अत्यंत जटिल आहे. तेव्हा ही जटिल व्यवस्था अंतर्भागातून कशी दिसते हे समजल्याशिवाय आजारांचे निदान करणे शक्य नाही. शरीर हे त्रिमितीय मात्र एक्स-रे द्विमितीय येतो. त्यामुळे एक्स-रे तपासणीमधून निदान करताना मर्यादा येतात. एक्स-रे तंत्राचा पुढचा टप्पा म्हणून सीटी स्कॅन तंत्रप्रणाली उदयाला आली. सीटी स्कॅनमध्ये विविध बाजूंनी क्ष-किरण सोडले जाऊन शरीराच्या अंतर्भागाची विविध अंगांनी छायाचित्रे घेतली जातात. संगणकाच्या साहाय्याने या छायाचित्रांच्या माध्यमातून शरीरातील विविध भागांचे त्रिमितीय स्वरूप पाहता येते आणि त्याद्वारे शरीरातील अंतर्भागाचे परीक्षण करता येते.
मेंदूच्या आजारासह मान, मणका, छाती, ओटीपोट, पोट आदी भागांमधील आजारांच्या निदानासाठी सीटी स्कॅनद्वारे तपासणी केली जाते. सीटी स्कॅन ही प्रणाली येण्यापूर्वी लक्षणांवरून केलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान नेमका आजार
कोणता आहे, याचे निदान होत असे. सीटी स्कॅन तंत्रप्रणालीमुळे मात्र आता शरीरातील प्रत्येक अवयवाचे अंतर्परीक्षण करणे सोपे झाल्याने आजारांचे निदान वेळेत करणे शक्य झाले आहे.
सीटी स्कॅन किंवा मॅग्नेटिक रिझोन्स इमेजिंग (एमआरआय) या दोन्ही तंत्रप्रणालीचे बाह्य़स्वरूप आणि त्यातून मिळणारी छायाचित्रे यामध्ये साम्य असले तरी या दोन्ही तंत्रप्रणाली भिन्न आहेत. सीटी स्कॅनमध्ये मेंदूच्या प्रत्येक भागात क्ष-किरण सोडले जाऊन मेंदूची रचना आणि त्यामध्ये होणारे बदल याचा अभ्यास केला जातो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा